You are here
Home > चंद्रपूर > स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नाविन्यपूर्ण कल्पना देणाऱ्यास मिळणार बक्षीस

स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नाविन्यपूर्ण कल्पना देणाऱ्यास मिळणार बक्षीस

नागरी सहभाग वाढविण्यास मनपाचे पाऊल

चंद्रपूर 10 नोव्हेंबर –  देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करिता या शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरीकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देवून हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविले जात आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यात घन कचऱ्याचे एकत्रीकरण व त्याची विल्हेवाट ही एक मोठी खर्चाची तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाची समस्या बनली आहे. लोकसहभागाने या समस्येवर तोडगा काढणे ही एक काळाची गरज आहे. यादृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेने नागरिकांसाठी एक अतिशय स्वागतार्ह अशी स्पर्धा राबविली जाणार आहे.
स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन करण्यासंबंधी शहरातील नागरिकांकडून त्यांच्या एक वेगळा दृष्टिकोन असलेल्या कल्पना मागविण्यात येणार आहेत, ज्यायोगे स्वच्छता राखणे व घनकचरा व्यवस्थापन करणे सोपे होईल. नागरिकांकडून दिल्या गेलेल्या अश्या संकल्पनेला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विशेष असे १५,००० व १०,००० अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्वरूपाचे बक्षीस दिले जाणार आहे. या संकल्पना केवळ विचार न राहता प्रत्यक्ष परिणामकारक ठरण्यासाठी याचे काही निकष ठरविण्यात आले आहेत.  दिल्या जाणाऱ्या  कल्पना, संकल्पना  या अभिनव, नाविन्यपूर्ण असणे आवश्यक आहे, या दीर्घकालीन परिणामकारक ठरणाऱ्या हव्या, केवळ खर्चीक न राहता आर्थिकदृष्ट्या भविष्यात तग धरू शकतील, छोट्या त्याचप्रमाणे मोठ्या आकाराच्या लोकसंख्येतही परिणामकारक ठरणाऱ्या हव्या आणि केवळ कागदी संकल्पना असण्याऐवजी त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रत्यक्ष वापर करता येऊ शकेल अश्या हव्या.
याशिवाय शहरातील एखादा नागरिक, संस्था स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासंबंधी परिणामकारक उपक्रम स्वयंस्फूर्तीने राबवित असेल तर त्यांनाही या योजनेअंतर्गत १५,००० व १०,००० रुपयांची अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिक दिले जाणार आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ स्पर्धेच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. कचऱ्यावर प्रक्रियेसाठी काही कल्पना या  कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे नवनव्या तंत्रज्ञान व कल्पनांचा यासाठी विचार करणे गरजेचे झाले आहे. कचरा विलगीकरण,सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, या विषयी वारंवार नागरिकांची जागरूकता वाढणे आवश्यक आहे.  घन कचरा व्यवस्थापनामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करणे व त्याची वाहतूक करणे याबरोबरच त्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे महत्त्वाचे असते. कचऱ्याच्या गंभीर समस्येवर महानगपालिकेकडून वेगवेगळ्या स्तरावर उपाययोजना करण्यात येतात, मात्र नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय १०० टक्के स्वच्छता कचऱ्याचे  वर्गीकरण व त्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन मनपा घनकचरा व्यवस्थापनात नागरी सहभागाला प्राधान्य देत आहे.
यादृष्टीने या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे आवश्यक आहे. असे झाले तर ही समस्या, समस्या न राहता पर्यावरण रक्षणाबरोबरच ते एक उत्पन्नाचे साधन बनू शकेल.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा