You are here
Home > मुंबई > प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघाती मृत्यू!

प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघाती मृत्यू!

नाशिक वार्ता :-

आपल्या सुमधूर आवाजाने मराठी रसिकांच्या मनावर  अधिराज्य गाजवणाऱ्या नाशिकच्या गायिका गीता माळी (40) यांचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून नाशिकला परतताना गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे.गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत होत्या. आज सकाळीच त्या मायदेशी परतल्या होत्या. एअरपोर्टहून नाशिकला परतत असताना महामार्गावर हा अपघात झाला. गीता माळी यांचे गायनाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

गीता माळी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडीयासह मराठी कलाक्षेत्रातील कलाकारांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार मुंबई- नाशिक महामार्गावर रस्त्यावर आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादामध्ये गीता यांची कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या HP Gas टॅंकरला धडकली आणि या गंभीर अपघातामध्ये गीता माळी यांचा दुर्दैवी अंत झाला. गीता यांचे पती विजय माळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गीता माळी यांची शेवटची पोस्ट

गीता माळी यांनी आज मुंबईत उतरल्यानंतर सेल्फी पोस्ट केला होता. त्यवेळेस मायभूमीत परतल्याचा आनंद व्यक्त करताना जननी_जन्मभूमी_स्वर्ग_से_महान_है ! या कॅप्शनसह त्यांनी खास फोटो पोस्ट केले होते.

दरम्यान गीता माळी यांच्या पश्चात एक मुलगा आणि पती आहेत. गीता माळी यांनी संगीतामध्ये एम ए केले असून मागील काही वर्षांपासून मराठी संगीत क्षेत्रात त्यांच्या आवाजाने जादू केली आहे. मागील तीन महिन्यात त्यांनी अमेरिकेत न्युयॉर्क, जॉर्जिया, फ्लॉरिडा सारख्या शहरामध्ये संगीताचे कार्यक्रम केले आहेत.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा