You are here
Home > महाराष्ट्र > शिवसेनेचाच मुख्यमंत्री, महाशिवआघाडीच ठरलंय!

शिवसेनेचाच मुख्यमंत्री, महाशिवआघाडीच ठरलंय!

मुंबई वार्ता “-

‘महाशिवआघाडीत मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार.’ असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यामुळे आता महाशिवआघाडीची सत्तास्थापनेबाबतची चर्चा ही सकारात्मकदृष्ट्या सुरु असल्याचे समजतं आहे. त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील मान्य केलं आहे की, महाशिवआघाडीत मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल.

मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना नवाब मलिक असं म्हणाले की, ‘मुख्यमंत्री पदामुळेच शिवसेना युतीतून बाहेर पडली. त्यामुळे महाशिवआघाडीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. त्यामुळे शिवसेनेचा सन्मान राखणं आणि स्वाभिमान कायम ठेवणं ही आमची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे महाशिवआघाडीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल हे निश्चित आहे. मात्र अस असलं तरीही अद्याप इतर पदांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.’ असं नवाब मलिक म्हणाले.

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच – काँग्रेसचं ठरलंय

दरम्यान, नवाब मलिक यांच्या आधी काँग्रेसचे नेते के. सी पाडवी यांनी देखील यांनी काही दिवसांपूर्वीच हेच मत मांडलं होत. सत्ता स्थापन करण्यासाठी सुरुवातीला शिवसेनेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फक्त २४ तासांचा वेळ दिला होता. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबाचे पत्र न मिळाल्याने शिवसेना दावा दाखल करू शकली नव्हती. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक बैठका झाल्या होत्या या बैठकीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करावी का यावर चर्चा झाली होती. पण अंतिम क्षणापर्यंत पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला मिळाले नव्हते. त्यामुळे शिवसेना सत्तास्थापन करु शकली नव्हती.

दरम्यान, या संदर्भात पत्रकारांनी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्रातील आमदार के. सी. पाडवी यांना विचारले असता, ते म्हणाले होते की, ‘शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यामुळे त्यांनी आपली ध्येय धोरणे बाजूला ठेवली आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळाल पाहिजे, आम्ही आतून किंवा बाहेरून पाठिंबा देऊ.’ असे म्हणत पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

यामुळे आता किमान मुख्यमंत्रीपदाबाबत तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता असल्याचं दिसून येत आहे. आता प्रश्न फक्त इतर मंत्रिपदांबाबत शिल्लक राहिला असल्याचं समजतं आहे.

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा