
लक्षवेधी :-
तो काळ होता महाराष्ट्रातील राजकीय आणीबाणीचा, राजसाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार ठरत असतांना खुद्द बाळासाहेबांभोवती बडव्यासची फौज असल्याने राजसाहेब आपल्या विठ्ठलापासून दूर फेकल्या गेले. काय करावे काही सुचेना आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक हे राजसाहेबांकडून फार अपेक्षा करायचे की आम्हाला आपल्यासोबत ठेवा, मात्र जिथे स्वतः राजसाहेबच हतबल होते तिथे इतरांना ते काय देवू शकणार होते ? मात्र तरीही त्यांचा जीव जणू घालमेल करीत होता, मनात एकदा येत होतं की जावू देत राजकारण, पण मग पुन्हा विचार डोक्यात तांडव करायचा की ज्या लाखो लोकांना आज तुझं नेत्रुत्व हवं आहे मग तू माघारी कशाला वळतोस ? चल कर तयारी. आणि मग निश्चयच केला की ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे, त्यांचा विश्वास आता ढळू देणार नाही.आणि मग त्याचं मनातल्या वैचारिक युद्धातून महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा विचार सुरू झाला व त्यातूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा जन्म झाला.
राजकीय पक्ष निर्माण करणे जेवढे सोपे असते तेवढे त्या पक्षाला उभारणी देणे फार कठिन असते. अशा काळात जो साथ देतो तोच खरा निष्ठावान कार्यकर्ता असतो.राजसाहेब जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले ते एकटेच. कारण त्यांना छगन भुजबळ सारखे किंव्हा नारायण राणे सारखे आमदार सोबत घेवून पक्षांतर करून बाळासाहेबांना वेदना द्यायच्या नव्हत्या. कारण ज्यांच्या अंगाखांद्यावर लहानपणापासून ते खेळले आणि अनेक राजकीय डावपेच ते बाळासाहेबांकडून शिकले ते त्यांना कसा काय दगा देणार होते? पण नाईलाजाने नवीन पक्ष काढून आपल्या राजकीय करियरला सुद्धा उभारणी देवून या महाराष्ट्रात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी माणसाचे स्वराज्य निर्माण करायचे होते आणि त्यासाठी हवे होते काही कट्टर मावळे.आणि त्या मावळ्यांमधे सर्वात पुढे आले ते आमदार बाळा नांदगावकर जे स्वतः आमदार असतांना आमदारकी सोडून मनसेत आले आणि त्यावेळी शिवसेनेचे एकमेव “शिवसैनिक” बाळा नांदगावकर बाळासाहेबांना मातोश्रीवर जावून बोलले.
“साहेब “उध्दवजी” बरोबर संपूर्ण सेना आहे,
आपला “राजा” एकटा आहे कृपया मला जावू द्या…
आणि क्षणाचाही विलंब न करता “बाळासाहेब” बोलले “बाळा” तु जा…
आणि बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून एकनिष्ठेने आज सुद्धा सोबत आहे.पक्ष स्थापनेपासून आले किती आणि गेले किती , पण बाळा नांदगावकर यांच्यासारखा एकनिष्ठ नेता पक्षात दुसऱ्या सापडणार नाही.आज खरं तर प्रवीण दरेकर किंव्हा राम कदम सारखे त्यांनी पक्षांतर केले असते तर बाळा नांदगावकर हे मंत्री सुद्धा असते पण त्यांनी सत्तेला लाथ मारून निष्ठा जपली आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून राजसाहेब ठाकरे यांना ते साथ देत आहे.
एकदा शिवतिर्थावर भाषण करतांना बाळा नांदगावकर यांनी खूप मार्मिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या ते म्हणाले होते की “सन्माननीय राजसाहेबांनी पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्या जाहीर सभेत जेंव्हा सांगितलं होतं की मी आजपासून या महाराष्ट्राला अर्पण करीत आहे , त्या सभेच्या वेळी मी मंडपाच्यामागे उभा होतो त्यावेळीच मी ठरवलं होतं की मी आजपासून मी सन्माननीय राजसाहेबांसाठी अर्पण करीत आहे,”
त्यामुळे खरंच बाळा नांदगावकर यांच्या निष्ठेला सलाम करावा असाच त्यांचा प्रामाणिक द्रुष्टीकोन आहे.