
भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रनाग मंदिर चौक येथे विज्जासन बुध्द लेणी प्रवेश द्वारसमोर उभारण्यात आलेल्या देखव्या संबंधाने दिनांक 14 जानेवारी 20 रोजी ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी वर्षावास आयोजन समितीच्या शिष्मंडळाने नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी गिरीश बन्नारे यांची भेट घेऊन संबंधित विषयाच्या अनुषंगाने निवेदन सादर केले. शिष्टंडळात मार्गदर्शक सिद्धार्थ सुमन, अध्यक्षा लीनता जूनघरे, सचिव संजय खोब्रागडे, उपाध्यक्षा छाया कांबळे, नंदा रामटेके, सहसचिव शीला खाडे, कवडूजी कांबळे, व इतर समिती पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
निवेदनात समितीद्वारे नमूद करण्यात आले की, प्राचीन ऐतिहासिक नगरी भद्रावती ला हिंदू, बौद्ध व जैन धर्माचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या नगरीस तीनही धर्माचे देशभरातील अनुयायी व पर्यटक भेटी देत असतात. शहरास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे तेव्हा शहराच्या विकास व सौंदर्यीकरण यात ताळमेळ व समतोल राखणे आवश्यक आहे.
भद्रनाग मंदिर चौक येथील बुध्द लेणी प्रवेशद्वार सौंदर्यीकरण करताना या ठिकाणी बौध्द संस्कृतीचे देखावे उभारणे संयुक्तिक होते , परंतु तसे न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा उभारण्यात आला.त्यामुळे बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
करिता त्या प्रवेशद्वार समोर बोद्ध संस्कृतीचे देखावे उभारावे व सामाजिक सलोखा कायम राखवा. तसेच त्या प्रवेशद्वाराचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. तेव्हा ते दुरुस्त करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.
नगराध्यक्ष मा. अनिल धानोरकर व मुख्याधिकारी गिरीश बन्नारे यांनी शिष्टमंडळा सोबत सविस्तर चर्चा करून सांगितले की , प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूस 10 फूट उंच भिक्षू संघासह तथागत भगवान बुध्द तथा डा. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उभारण्यात येईल. तसेच प्रवेश द्वाराची सुद्धा दुरुस्ती करण्यात येईल.
शिष्टमंडळाने हे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली व ती मान्य करण्यात आली. असे या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.