You are here
Home > नागपूर > अडचणींवर मात करा, ‘स्टार्ट-अप’ने झेप घ्या!

अडचणींवर मात करा, ‘स्टार्ट-अप’ने झेप घ्या!

युट्यूबर रणवीर अलाबादीयाने दिला तरुणाईला मंत्र

नागपूर, ता. २४ : आपल्या मनातील संकल्पनांना मूर्त रुप आणण्याचे स्टार्ट-अप हे मोठे माध्यम आहे. मात्र अनेकदा याविषयी पुरेपुर माहिती नसल्याने अपयशाचा सामना करावा लागतो. कोणत्याही गोष्टीच्या यशासाठी कोणतिही अपेक्षा न ठेवता काम करणे व इतरांना देत राहणे ही भावना आवश्यक आहे. कामातील सातत्य आणि त्यामागची मेहनत ही कोणत्याही उद्योगासाठी आवश्यक आहे. मात्र या सर्वांमध्ये अनेक अडचणी येतात या अडचणींचा धैर्याने सामना करा, अडचणींवर मात करा आणि आपल्या संकल्पनांना ‘स्टार्ट-अप’ची जोड देउन झेप घ्या, असा मंत्र सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी मानकापूर स्टेडियममधील उपस्थित तरुणाईला दिला.

‘इनोव्हेशन पर्व’च्या दुस-या दिवशी ‘स्टार्ट-अप’ फेस्टमध्ये सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी शनिवारी (ता.२४) मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये उपस्थित तरुणाईशी संवाद साधला. यावेळी तरुणांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देत त्यांना ‘स्टार्ट-अप’चा नवा मंत्रही त्यांनी दिला.

अभियांत्रिकी शिक्षण घेउनही कोणत्याही कंपनीमध्ये प्लेसमेंटमध्ये सहभागी झालो नाही. यामागे स्वत:च स्वत:चा बॉस बनायचे ही भावना होती. त्यातून पुढे अनेक अडचणींवर मात करून युट्यूब चॅनेलचा उदय झाला आणि तो जगाने डोक्यावर घेतला. केवळ एक संकल्पना आणि त्यावरील सातत्याने करण्यात येणारी मेहनत ही कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी आवश्यक आहे, ही शिकवण आयुष्यात पदोपदी मिळत आहे, असेही सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी सांगितले.

स्वत:चे ‘स्टार्ट-अप’ सुरू करण्यापूर्वी मार्केट गॅपची माहिती घ्या, मार्केटमध्ये काय हवे आहे याचा अभ्यास करा. एखाद्या अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनात काही वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करा, त्यातून मिळणारे अनुभव स्व निर्मितीला बळ देणारे ठरले, असाही मंत्र सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी दिला.

ध्येय प्राप्तीसाठी झपाटून कार्य करा : सुप्रसिद्ध युट्यूबर गौरव तनेजा

स्वत:च्या मनातील संकल्पनांच्या पूर्ती करण्यासाठी त्या संकल्पनांच्या पुढील वाटचाल आणि मार्गक्रमणासाठी ‘इनोव्हेशन पर्व’सारखे व्यासपीठ महत्वाची भूमिका बजावते. आज आपल्या संकल्पनांना बळ देण्यासाठी असे व्यासपीठ महत्वाचे ठरते. मात्र हे व्यासपीठ फक्त आपल्याला एक मार्ग दाखवितात. आपल्या संकल्पनांच्या पूर्तीसाठी त्याला ‘स्टार्ट-अप’ची जोड देउन कार्य करण्यासाठी स्वत: जमिनीस्तरावर कार्य करणे आवश्यक आहे. एकदा आपले ध्येय निश्चीत करुन त्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्याने झपाटून कार्य करा, असा मंत्र सुप्रसिद्ध युट्यूबर गौरव तनेजा यांनी दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले, आयुष्यात काही करण्याच्या भावनेने आज युट्यूबर म्हणून आज ओळख मिळाली आहे. जिममध्ये तास न् तास घालविताना अनेकांनी वेड्यात काढले. मात्र त्यातून मिळणा-या यशामध्ये तेच व्यक्ती पुढे आले. जीवनात काही मिळवायचे असेल तर स्वत:च्या ध्येयासाठी वेड्यासारखे झपाटून कार्य करा, ही शिकवण त्यावेळपासून मिळाली आणि तोच मंत्र सर्वांसाठी प्रेरणा ठरावा, अशी अपेक्षाही सुप्रसिद्ध युट्यूबर गौरव तनेजा यांनी व्यक्त केली.

‘स्टार्ट-अप’च्या यश-अपयशावर चर्चासत्र

यावेळी ‘स्टार्ट-अप’द्वारे आपल्या संकल्पनांना मूर्तरुप देउन त्यांची अंमलबजावणी करणा-यांनी आपल्या उद्योगांबाबत माहिती दिली. रिसायकल बेल प्रा.लि.चे मधुर राठी, बिन बॅगचे सीईओ श्री. अचित्र, ग्रोनअप्सचे यश मेश्राम, सरल डिझाईनचे अभिजीत पाटील, किसान समृद्धी 2.0 चे अजय अंबागडे व आर्या अंबागडे या वडील व मुलीची जोडी, आयआयटी बॉम्बेचे अथर्व पाटणकर, अपना घरचे प्रकाश जायस्वाल आदींनी ‘स्टार्ट-अप फेस्ट’द्वारे आपल्या संकल्पना मांडल्या.

याशिवाय गटचर्चेमध्ये ‘स्टार्ट-अप’ अपयशी का होते? याविषयावर आयोजित गटचर्चेमध्ये संतोष अब्राहम, भारत सरकार एमएचआरडी चे इनोव्हेशन डायरेक्टर डॉ. मोहत गंभीर, प्रियश जिचकार, मुकुंद प्रसाद यांनी विषयाशी संबंधित आपली भूमिका मांडली. गटचर्चेचे समन्वयन ज्येष्ठ मार्गदर्शक चैत जैन यांनी केले.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा