You are here
Home > महाराष्ट्र > वारकरी चळवळीचे महानायक राष्ट्रसंत,संत शिरोमणी,संत सेना महाराज पुण्यतिथी विशेष लेख

वारकरी चळवळीचे महानायक राष्ट्रसंत,संत शिरोमणी,संत सेना महाराज पुण्यतिथी विशेष लेख

बाराव्या शतकात मध्यप्रदेशात विषमते विरुध्द बंड पुकारणारे नाभिक समाजाचे राष्ट्रसंत,संत शिरोमणी,संत सेनाजी महाराज यांचा जन्म मध्यप्रदेश राज्यातील उमरीया या जिल्हयातील बांधवगड या गावी झाला.  प्रामुख्याने  क्रांतीची भाषा बोलणारे परिवर्तनाचे वादळ म्हणजेच एक धगधगता अंगार जन्माला आले. त्यांच्या वडिलांचे नाव देविदास वैद्य तर आईचे नाव प्रेमकुंवरबाई देविदास वैद्यअसे होते.राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचे वडिल हे तत्कालीन राजा रामराया आदित्य यांच्याकडे मंत्री मंडळातील  एक चाणाक्ष, कर्तुत्ववान,नितीमान व प्रभावशाली मंत्री होते.सेना महाराजानी समाजातील अज्ञान,अंधश्रध्दा,कर्मकांड,दैववाद,शोषण,विषमता,जातीभेद,मानवी विकास व उत्कर्षाच्या आड येणा·या अमानवीय प्रथेच्या विरोधात कणखर दंड थोपटून बंड पुकारण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. निद्रिस्त समाजाला गदगदा हलवून,खडबडून जागे करण्याचे काम त्यांनी केले.
जातीविरहीत व शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी भारतभ्रमण सुरु करुन अव्याहतपणे मानवतेच्या संगोपन,संवर्धन व संरक्षणासाठी अनेक भाषा त्यांनी अवगत केल्या आणि त्या माध्यमातून कृतीयुक्त पध्दतीने समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी केले. मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभुत्व मिळविले की,मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगाची निर्मिती केली.वारकरी चळवळीत स्वत:ला झोकुन देवून चार वर्णाच्या  गराड्यात आडकलेला हा समाज व त्यातील जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांचा अविरत लढा होता. कर्मठ उच्चवर्णीयांनी निर्माण केलेली उच्च-निच्च जातीभेद ही पंरपरा मोडीत काढण्यासाठी त्यांचा महत्वपूर्ण संघर्ष होता. जे मानवा-मानवात उच्च-निच्चता समजतात त्यांना उद्देशुन सेना महाराज खडा सवाल टाकतात. मानवतेची घडी विस्कटणारे व त्याच विस्कळीतपणात परमेश्वर दाखविणा·यांना ते सांगतात की,जाती कुळाने भक्ती श्रेष्ठत्व ठरत नसून त्यांच्या शुध्दभावावर व कर्मावर ठरते. आणि परमेश्वर हा व्यक्तीच्या चांगल्या आचरणात व सतकर्मात असतो हेच मर्म त्यांनी सांगितले.
सेना महाराजांच्या अशा विविध समतामुलक समाज निर्मितीस पुरक असलेल्या अभंगांचा समावेश शिख धर्मातील घ्गुरुग्रंथसाहिबङ या पवित्र ग्रंथात करुन त्यांना मानाचे स्थान प्राप्त करुन दिले आहेत. जात आणि कला यांची सांगड घालून वर्णव्यवस्था उदयाला आली असे त्यांचे मत होते.  शुद्र,सवर्ण या मानव निर्मित कल्पना आहेत. सत्य,सदाचार म्हणजेच स्वर्ग होय आणि असत्य म्हणजेच मृत्यूलोक अशी त्यांची धारणा होती.  जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह व सहभोजन यासारखे त्यांनी उपाय सांगितले.
समाजातील जाती व्यवस्थेवर अंधश्रध्देवर आसुड ओढणारे अनेक अभंग त्यांनी लिहिले. आणि त्यानुसार समाजात वैचारिक परिवर्तन बदल घडवून आणण्याचे कार्य केले.म्हणजे सेनाजी महाराज हे नुसते शब्दवीरच नव्हते तर कृतीवीर होते.माणसाला माणूस म्हणून सन्मानाने व स्वाभिमानाने विवेकपूर्ण जिवन जगता यावे यासाठी त्यांचा महत्वपूर्ण प्रयत्न होता.यासाठी त्यांनी अठरा राज्यात फिरुन वारकरी चळवळ भक्कम करुन अन्याय-अत्याचार,अंधश्रध्दा यावर प्रहार,वार करुन वारकरी ही संकल्पना दृढ केली.
स्त्री चा सन्मान झाला पाहिजे, कामगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा महत्वाचा लढा होता.अशा परिवर्तनवादी, विज्ञानवादी समाज सुधारकाच्या,राष्ट्रसंताच्या विचारांना नष्ट करण्याचा प्रयत्न इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने केला आहे.
 राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांचा संदेश-
 चोरी करु नका.
खोटे बोलु नका
 व्यभिचार करु नका
 मद्यपान करु नका
 प्राणीमात्राची हत्या करु नका.
 कठोर परिश्रम करा.
 असा अखिल मानव जातीसाठी लोककल्याणकारी असणारा संदेश त्यांनी जनमाणसाला दिला.  पर्यावरणाचे नुकसान करणा·या व्यक्तीचा धिक्कार करणारे बाराव्या शतकातील पहिले संत म्हणजे राष्ट्रसंत सेनाजी महाराज होत.
एकंदरीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांनी जनमाणसाला देण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी महाराष्ट्र,मध्यप्रदेश,कर्नाटक आणि पंजाब यांना जोडणारा समान धागा म्हणजे महात्मा बसवेश्वर,संत नामदेव व संत सेनाजी महाराज होत.
 प्रामुख्याने नाभिक समाजाचा अलौकिक व राष्ट्र निर्माणासाठी पोषक असलेला इतिहास पाहता तथागत बुध्दांच्या सहवासातील भन्ते उपाली पासून तामिळनाडू च्या नौनादेवी, वारकरी चळवळीचे महानायक  राष्ट्रसंत सेनाजी महाराज,महात्मा बसवेश्वरांचे स्वीय सचिव हडपद न्हावी,महात्मा बसवेश्वरांची वचने जनमाणसात आणण्यासाठी स्वत:चे घर विकून रस्त्यावर राहणारे शिवशरण हळकट्टी न्हावी,स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांवर सय्यद बंडाचा होणारा वार आपल्या अंगावर घेणारे नाभिक समाजभूषण जिवाजी महाले,पन्हाळ गडावरुन शिवाजी महाराजांची सुटका होण्यासाठी हुबेहूब शिवाजी महाराजांचे प्रतिरुप धारण करणारे व आपल्या प्राणाची पर्वा न करता जिवाची बाजी लावणारे विर शिवाजी काशीद,स्वातंत्र्य सौनिक विरभाई कोतवाल,सांडु सखाराम वाघ,शाहिर लाला वाघमारे इथपर्यंतचा इतिहास हा मानवी समाजाला ऊर्जा देणारा व नवचेतना प्रदान करणारा असा आहे.  ज्या व्यवस्थेने या समाजाला हिन समजलाय तोच समाज एवढी राष्ट्र निर्माणास पोषक असणारी कारकिर्द उभी करु शकते ?….ही एक चिकीत्सक विचार करण्यास भाग पाडणारी गोष्ट आहे.
 माणसातील माणूसकी नष्ट झालेल्या माणसाला माणूस जोडण्याचे काम सेनाजींनी केले. राष्ट्रव्यापी,विश्वव्यापी, लोककल्याणकारी काम,शेतकरी,कष्टकरी,श्रमकरी,मजुर,महिलांच्या शोषणमुक्तीचे काम सेना महाराजांनी केले.आपल्या जीवन कार्यात त्यांनी तथागत बुध्दांना,भारतीय स्वातंत्र्याला,भारतीय संविधानाला, समतामुलक समाज निर्मितीस अपेक्षित असलेलं कार्य त्यांनी केले.  एकंदरीतच त्यांनी मानवीय हिताचे काम त्यांनी केले.
 आणि या महान संताची विवेकी विचारधारा जर समजून घेतली तर संताच्या विचारधारेवर आधारीत राष्ट्रव्यापी व एक विश्वव्यापी वारकरी चळवळ उभी राहील.                                            _”एक खंत मात्र प्रत्येक नाभिकांच्या मनात नेहमीच बोचते,ती म्हणजे नाभिक महापुरुषांच्या जयंत्या व पुन्यतिथ्या ह्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या केल्या जातात. एवढंच काय तर प्रत्येक संघटनेच्या विचारात पण या विषयावर मतभिन्नता आढळते.हे मला वाटते कुठंतरी थांबवुन एकत्र येऊन यांवर सर्व मान्य तोडगा निघला पाहीजे,हि सर्व सामान्य नाभिकांची भुमिका मात्र या निमित्ताने जोर धरु लागली आहे.यावर विचार होणे गरजेचे वाटते.”_                                            त्यांच्या या पुण्यतिथी दिनानिमित्त वारकरी चळवळीच्या या महानायकाला कोटी-कोटी प्रणाम व अभिवादन !! अभिवादन !! अभिवादन !!! अभिवादन !!!!
लेखन – पांडुरंग मामिडवार, ता़.बलोनी, नांदेड
संकलन –  शरद उरकुडे, भंडारा
admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा