You are here
Home > महाराष्ट्र > आणि 72 वर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या…….

आणि 72 वर्षाच्या आठवणी ताज्या झाल्या…….

पोलंड मधील नागरीक कोल्हापूर भेटीला

कोल्हापूर, दि. 13 : 1942 ची वेळ….दुस-या महायुध्दाला सुरूवात….काही परदेशी नागरीक भारतातील कोल्हापूर येथे आश्रयाला आले….आणि कोल्हापूरकर झाले….युध्द समाप्तीनंतर ते नागरीक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्या मनात कोल्हापूरकर कायम राहिले. ते नागरीक होते पोलंडवासी…..त्याच आठवणींना आज 72 वर्षानंतर लुडमिला जॅक्टोव्हीझ या महिलेने उजाळा दिला. 1942 ते 1948 या कालावधीत कोल्हापुरात निर्वासित म्हणून राहिलेल्या पाच हजार नागरिकांमधील 27 नागरिकांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. आज या नागरिकांनी पन्हाळा किल्यास भेट देऊन किल्याची माहिती जाणून घेतली. तसेच आपल्या लहानपणीच्या कोल्हापुरात वास्तव्यातस असलेल्या आठवणींनाही उजाळा दिला.

 सन 1936 ला जन्म झालेल्या लुडमिला या आज 83 वर्षाच्या वृध्द महिला आहेत. मात्र भारत भेटीचा त्यांचा उत्साह त्यांना तारूण्यात नेणारा होता. त्यामुळे त्या जुन्या आठवणी सांगतांना फार उत्साहीत होत्या.

 दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान निर्वासित झालेल्या पोलंड 5000 हजार नागरिकांना भारतातील कोल्हापूर येथील वळीवडे या गावी आश्रय घेतला होता. त्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्व परदेशी नागरीक आपल्या मायदेशी परतले. मात्र त्यांच्यात भारतातील आठवणी या कायम राहिल्या.

पन्हाळा किल्यावरील धान्याचे कोठार (अंबरखाना) व तीन दरवाजा या ठिकाणी भेट देऊन या परिसराची पहाणी करुन किल्याची माहिती जाणून घेतली. रविराज निंबाळकर यांनी पथकातील नागरीकांना पन्हाळा किल्याची रचना, मराठा साम्राज्याबाबत सविस्तर माहिती दिली. किल्ला पहाणीनंतर पन्हाळा नगरपरिषदेच्यावतीने या नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

पन्हाळा किल्ला येथील बाजीप्रभू देशपांडे पुतळा चौकात पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा श्रीमती रुपाली धडेल, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या नगरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पन्हाळा किल्याबाबत यावेळी या नागरिकांना माहिती दिली.  या वेळी  पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेंडगे यांच्यासह पन्हाळा नगरपरिषदेचे नगरसेवक व मान्यवर नागरीक उपस्थित होते.

मरेपर्यंत माझ्या मनात भारत राहिल – लुडमिला जॅक्टोव्हीझ, पोलंड येथील नागरीक

भारत ही पवित्र भूमी आहे. या भूमित वास्तव्यास असताना मी 11 वर्षाची होती. आईने माझ्या हातात घातलेल्या दोन बांगड्या आजही आहेत. कोल्हापूरची ही आवठवण मी आजही माझ्यासोबत ठेवली असल्याची भावना लुडमिला जॅक्टोव्हीझ यांनी यावेळी व्यक्त केली.

वळविडे येथे १९४२ ते १९४८ या कालावधीत लुडमिला या आईसमवेत रहात असताना आईने वळीवडे येथे कॅम्प मध्ये हातात घातलेली बांगडी पोलंड च्या निर्वासित महिलेने आठवण म्हणून जपून ठेवली आहे. ७२ वर्षा पासून हातात असेलेली बांगडी असून भारतातील शाहु महाराजांच्या भुमीची आठवण जपून ठेवल्याचं त्यांनी यावेळी सांगितले .

अन् सासुबाईची आठवण झाली–शमा अशोक काशीकर

माझ्या सासुबाई मालती वसंत काशीकर (पोलंड येथील नाव वाँडरव्हिक्स) या 1942 च्या काळात भारतात आल्या.  सासरे वसंत काशीकर हे त्याकाळी ब्रिटीशांकडे नोकरीस होते. वाँडरव्हिक्स या माझ्या सासूबाई माझ्या सासऱ्यांना आवडल्या, दोघांनी विवाह केला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सर्व पोलंड येथील नागरीक आपल्या मायदेशी परतले. मात्र माझ्या सासुबाई येथे राहिल्या. त्यांची बहिण हाना ही सुद्धा आपल्या मायदेशी परतली. तेंव्हापासून पोलंड आणि काशीकर कुंटुबाचे ऋणानुबंध कायम आहेत. दोन-तीनवर्षापुर्वी सासुबाईंचे निधन झाले. आज त्यांच्याही आठवणींना उजाळा मिळाला.

कोल्हापूरच्या मातीशी समरस-ओल्फ, केपटाऊन दक्षिण अफ्रिका

माझी बहिण क्रोस्टिना आणि मी त्यावेळी भारतात आलो आणि या मातीशी समरस झालो.  ती आठवण आजही मनात कायम आहे. आज माझी बहिण क्रोस्टिना हयात नाही. मात्र तिची मुलगी ईजाबेला कोझीयाली आज माझ्यासोबत या भेटीला आली.  आज माझी बहिण असती तर खुप बरे वाटले असते. त्यावेळेस आम्हाला इतके प्रेम मिळाले की, कोल्हापूरही आमची भूमिच झाली.

भारत व पोलंडचे ऋणानुबंध कायम रहावेत–ईवा क्लार्क

            मी सध्या युनायटेड स्टेट येथील रहिवाशी आहे. माझे आईवडील हे 72 वर्षापुर्वी कोल्हापूर येथे वास्तव्यास होते.  आज त्यांचे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी  मी या भूमित आले. मला येथे येऊन खुप आंनद झाला. भारत आणि पोलंडचे ऋणानुबंध असेच कायम राहावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा