You are here
Home > चंद्रपूर > चंद्रपुरात उत्साहात साजरा झाला गणपती विसर्जन सोहळा 

चंद्रपुरात उत्साहात साजरा झाला गणपती विसर्जन सोहळा 

एकूण ८८४३ गणेशमूर्तींचे विसर्जनपहाटे ६ पूर्वी रस्ते स्वच्छ.

चंद्रपूर –  गेल्या 10 दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ८८४३ गणेशमूर्तींचे विसर्जन,करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करून आपले कर्तव्य यशस्वीरीत्या पार पाडले.

     विसर्जनाच्या दिवशी चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडत लाडक्या बाप्पाला उत्साहाने निरोप दिला. याप्रसंगी गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. महानगरपालिकेतर्फे जटपूरा गेट वरून बाप्पांवर पुष्पवृष्टी करून सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकींचे  स्वागत करण्यात येत होते. शहरात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘गणपती बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला.

   गणेश विसर्जन मिरवणुक दुपारी ४ नंतर गांधी चौकातून सुरु झाली. याप्रसंगी चंद्रपूरकर गणरायाचा नामघोष, मंत्रोच्चार, ढोल ताशांच्या गजर आणि श्रीं च्या विसर्जन मिरवणुकीच्या रथाची आकर्षक सजावट करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत होते. यावेळेस विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी रेन वॉटर हार्वेस्टींग, पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, प्रदूषण नियंत्रण याबाबत आकर्षक देखाव्या द्वारे जनजागृती केली.  गणपतीचे आगमन – विसर्जन मार्गावर होता क्षणी भाविकांचा गणपती बाप्पा मोरयाचा गजर ऐकण्यास मिळत होता. यावेळी या गणपतीचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाली..

    गणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० पर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते. यासाठी विभागातर्फे त्यांना काम ३ शिफ्ट मधे वाटून देण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करत होते. शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी आणि नंतर अश्या दोन्ही वेळेस रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. कृत्रिम कुंडांची स्वच्छता करण्यात आली. शेवटची गणेश मूर्ती रात्री २ च्या सुमारास  शिरविण्यात आली.  मनपा स्वच्छता विभागाने रात्री १२ वाजता नंतर स्वच्छतेचे कार्य सुरु केलेअथक प्रयत्न करून मिरवणुकीदरम्यान वाहतुकीने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत साफ करून चकचकीत करण्यात आले.

   संततधार पावसाने ईरई धरणाची वाढलेली पातळी पाहता विसर्जन प्रसंगी धोकादायक परिस्थिती उदभवू शकत होती. यावर खबरदारीचा उपाय म्हणून मनपातर्फे आपत्ती व्यवस्थापन चमू सज्ज ठेवण्यात आली होती.  नागरिकांना नदीपात्रात उतरण्यापासून परावृत्त करण्यात आले तसेच धोक्याचा इशारा देणारे फलक पालिकेतर्फे लावण्यात आले तसेच अग्निशमन यंत्रणा व तातडीची आरोग्य सेवा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

   महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर पर्यंत ७००७ मातीच्या मूर्ती व १८३६ पीओपी अशा एकूण ८८४३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. सगळ्या लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा कर्मचारी प्रयत्नशील होते,  मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावातच गणेश मूर्ती विसर्जित करण्याचा तसेच निर्माल्य कलशातच टाकण्याचा आग्रह स्वयंसेवक करीत होते. नागरिकांनाही त्यास प्रतिसाद देऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव विसर्जनास हातभार लावला. याद्वारे बहुतांश मूर्तींचे विसर्जन रामाळा तलाव , गांधी चौक, शिवाजी चौक , दाताळा रोड, इरई नदी , पं. दीनदयाळ उपाध्याय तुकूम प्रा. शाळा,  झोन क्र. ३ कार्यालय,   नेताजी चौक बाबुपेठ, बंगाली कॅम्प झोन ऑफिस, विठोबा खिडकी विठ्ठल मंदिर वॉर्ड , शिवाजी चौक, लोकमान्य टिळक प्रा. शाळा पठाणपुरा रोड,  येथे झाले.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा