
– बबनराव लोणीकर
मुंबई, दि. 20 : वारंवार दुष्काळ पडत असल्याने निर्माण होणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्हयातील मौजे लोहारा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिली.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौजे लोहारा, ता.पोचोरा, जि.जळगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस 1361.50 लक्ष (निव्वळ), व रुपये 1505.92 लक्ष (ढोबळ) इतकी अंदाजपत्रकीय रक्कम नमुद करण्यात आली आहे.
मौजे लोहराकरिता योजेनेचा उद्भव बांबरुड पाझर तलावाजवळ उत्पादक विहीर असून उन्हाळ्यात पाझर तलावात पाणी नसल्यामुळे हा उद्भव कोरडा पडतो. त्यामुळे लोहारा गावास तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. तसेच कुठलाही शाश्वत उद्भव नसल्यामुळे गावास उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी व गावाची वाढती लोकसंख्या विचारात घेता नळ पाणीपुरवठा प्रस्तावित योजनेसाठी वाघूर धरणाची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती श्री.लोणीकर यांनी दिली.
मौजे लोहारा येथील आस्तित्वातील स्त्रोताद्वारे सर्वसाधारण 25 लिटर प्रतीमाणसी तर उन्हाळ्यात 4 लिटर प्रतीमाणसी पाणी उपलब्ध होत असून नवीन प्रस्तावित येाजनेतून ४० लिटर प्रती माणसी पाणी उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौजे अंथुर्णे, ता.इंदापूर, जि.पुणे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस 658.55 लक्ष (निव्वळ), व रुपये 711.47 लक्ष (ढोबळ) इतकी अंदाजपत्रकीय रक्कम नमुद करण्यात आली आहे.
मौजे अंथुर्णे येथील अस्तित्वातील उद्भव उन्हाळ्यात कोरडा पडत असल्याने पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे शाश्वत भूपृष्टीय स्त्रोत घेवून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी निरा डावा वीर कालवा हा उद्भव निवडण्यात आला आहे तसेच साठवण तलावही घेण्यात आला आहे.
मौजे अंथुर्णे येथील अस्तित्वातील स्त्रोताद्वारे सर्वसाधारण 25 लिटर प्रतीमाणसी तर उन्हाळ्यात 10 ते 15 लिटर प्रतीमाणसी पाणी उपलब्ध होत असून नवीन प्रस्तावित येाजनेतून ४० लिटर प्रती माणसी पाणी उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौजे कोल्हापूर (बु) व भगवतीपूर, ता.राहता, जि. अहमदनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेस 2166.34 लक्ष (निव्वळ), व रुपये 2621.27 लक्ष (ढोबळ) इतकी अंदाजपत्रकीय रक्कम नमुद करण्यात आली आहे.
मौजे कोल्हापूर (बु) व भगवतीपूर ग्रामपंचायत हद्दीतील वाड्यावस्त्यांकरिता अस्तित्वात असलेल्या पाण्याचा स्त्रोत हा पिण्यायोग्य नसल्याने त्यांना शाश्वत व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता योजना आवश्यक आहे या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा प्रस्तावित योजनेसाठी प्रवरा डावा कालवा (भंडारदरा जलाशय) हा उद्भव निवडण्यात आला आहे.
मौजे कोल्हापूर (बु) व भगवतीपूर येथील अस्तित्वातील स्त्रोताद्वारे सर्वसाधारण 35 लिटर प्रतीमाणसी तर उन्हाळ्यात 25 लिटर प्रतीमाणसी पाणी उपलब्ध होत असून नवीन प्रस्तावित येाजनेतून ४० लिटर प्रती माणसी पाणी उपलब्ध होणार आहे.