You are here
Home > चंद्रपूर > मतदान करणाऱ्यांना खरेदीवर मिळणार सूट

मतदान करणाऱ्यांना खरेदीवर मिळणार सूट

चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर : लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या देशाच्या जबाबदार नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापार, उद्योग व हॉटेल क्षेत्रातील संघटना पुढे आल्या आहेत. 21 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रावरून आपले अमुल्य मत देऊन लोकशाही बळकट करणार्‍या नागरिकांना मतदान झाल्यानंतर व त्या पुढील दिवसांमध्ये हॉटेल, मॉल ,सिनेमागृह, रेस्टॉरंट व विविध ठिकाणी करण्यात येणाऱ्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्याचे व्यावसायिकांनी जाहीर केले आहे.

            भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्येक मतदाराला आपला हक्क वापरता यावा यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज यासंदर्भात जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिक, किराणा व्यवसाय व विविध व्यापार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत विस्तृत बैठक घेतली. यावेळी या संघटनांनी मतदान वाढीसाठी यापूर्वी केलेल्या प्रयत्नांची देखील माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना आवाहन करताना सांगितले की, लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मतदान करणाऱ्या मतदात्याला लोकशाही बळकट करण्याच्या त्याच्या मताधिकाराचा अंमल केल्यासाठी सन्मानित करण्याची परंपरा रुजविण्याचे आवाहन केले.

            यावेळी व्यापाऱ्यांनी अनेकांना आपले मतदान कुठे आहेत, याबाबतची माहिती नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी महोदय यांनी यासंदर्भात 1950 या हेल्पलाईनचा वापर करण्यात यावा. या हेल्पलाइन क्रमांकावर दूरध्वनी करून आपले नाव आपला मतदार क्रमांक व मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती मतदारांनी आधीच घेऊन ठेवावी, असे आवाहन केले. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान यादीच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मतदारांनी मोठ्या संख्येने यासाठी पुढे यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

            या बैठकीमध्ये व्यावसायिकांनी विविध मुद्दे उपस्थित केले. तसेच मतदान करून आलेल्या मतदाराला त्याच्या बोटावरील शाई बघून मोठ्या प्रमाणात सूट देण्याबाबत इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात अधिकृत निवेदन या व्यापारी संघटनांकडून जिल्हाधिकारी यांना दिले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन यासाठी आज विशेष निमंत्रित केल्याबद्दल या संघटनांनी आभार मानले.

            या विशेष बैठकीला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र पुरोहित, चंद्रपुर व्यापारी मंडळाचे सागर चिंतावार, चंद्रपूर व्यापारी मंडळाचे सुमित कोतपल्लीवार, एन.डी. हॉटेलतर्फे अशोक हासानी, हॉटेल सिद्धार्थतर्फे राजू सलुजा, बिकानेर भुजियातर्फे राजकुमार अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, चंद्रपूर व्यापारी मंडळाचे प्रभाकर मंत्री,वीरेश राजा, हॉटेल रसराजतर्फे महेश उपाध्याय, मेहर रेस्टोरेंटतर्फे महेश माणिक, बिग बाजार तर्फे पंकज कुंभारे, विशाल ददमल, अन्न व औषधी विभागामार्फत अमरनाथ सोनटक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेन्द्र लोखंडे ,जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, या उपक्रमाच्या प्रभारी सीएम फेलो रश्मी बबेरवाल आदी उपस्थित होते.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा