You are here
Home > नागपूर > उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची तपशीलवार माहिती घ्या

उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची तपशीलवार माहिती घ्या

निवडणूक निरीक्षकांनी दिल्या टिप्स

नागपूर दि.28:विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चाबाबतचे तपशील काटेकोरपणे तपासण्याच्या सूचना खर्चविषयक निवडणूक निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती यांनी दिल्या.

उमेदवारांच्या प्रचार प्रसिद्धी, जाहीर सभा आदींच्या खर्चाबाबतचा दैनंदिन अहवाल उमेदवारांकडून मिळविण्यासंदर्भातील टिप्स निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात निवडणूक निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती आणि गौतम पात्रा यांनी नोडल अधिकाऱ्यांचा कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुजाता गंधे, शितल देशमुख, हेमा बढे, शिवनंदा लंगडापुरे, आणि जिल्हा नियोजनचे विजय कोल्हे यांची उपस्थिती होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी. सर्व निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांनी निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी अत्यंत जबाबदारीने काम करावे. सर्वांनी एक टीम म्हणून उत्स्फुर्तपणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात मात्र दक्ष राहून काम करावे. विशेष प्रशिक्षणानंतरही काही अडचणी येत असतील तर वरिष्ठांकडून तात्काळ शंकानिरसन करुन घेण्याचे निवडणूक निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती यांनी सांगितले.

निवडणूक काळात कर्तव्यावर असलेल्या नोडल अधिकारी, भरारी पथक, स्टॅटेस्टीक, सर्व्हीलन्स टीम, व्हीडीओग्राफी टीमने अचूक नोंदी घ्याव्यात. त्या नोंदीबाबत तात्काळ निवडणूक खर्च निरीक्षकांना अवगत करावे. निवडणूक आयोगाने दिलेली जबाबदारी चोख पार पाडावी. आचारसंहिता काळात अवैध मद्यसाठा आणि रोकडीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही निवडणूक खर्च निरीक्षक द्वयांनी दिले.

केंद्रीय निवडणूक आयोगाला खर्च निरीक्षकांना वेळोवेळी अपडेट द्यावे लागतात. त्यामुळे ते अपडेट वेळोवेळी वरिष्ठांना कळवावेत, जेणेकरुन केंद्रीय निवडणूक आयोग जिल्ह्यातील अद्ययावत माहिती देऊ शकेल. राजकीय पक्षाचे मेळावे, रॅली तसेच निवडणूक विभागाच्या आढावा बैठकांचे चित्रीकरण असणे आवश्यक असल्याचे सूचनाही त्यांनी दिल्या.

स्थानिक परिस्थिती, निवडणुकीदरम्यान होत असलेल्या विविध हालचाली यांवर लक्ष ठेवून त्या हालचाली वरिष्ठाना कळवावीत. सर्व विभाग आणि नागरिकांशी सदैव संपर्कात राहावे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा निवडणूक आयोगाला वेळोवेळी अहवाल पाठविला जातो. या काळात कर्तव्यात कसूर करणारांवर कडक कारवाई केली जाते. त्यामुळे आयोगाने नियुक्त केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश व सूचनांचे दक्षतेने पालन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

सुब्रा ज्योती चक्रवर्ती हे नागपूर पूर्व, मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक असून, गौतम पात्रा हे उमरेड, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक आहेत.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा