पुणे : पक्षाची धेय-धोरणे शेवटच्या घटकांपर्यंत घेऊन जा, शाखेच्या पातळीवर संघटना अधिक मजबूत करा, सर्व समाज घटकांना समावून घेण्यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करा, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. दोन दिवसात पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचा आढावा ठाकरे यांनी घेतला.
पुण्यातील तीन दिवसांचा नियोजित दौरा ठाकरे यांनी दोन दिवसातच आटोपता घेतला. पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व संलग्न संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक 15 जूननंतर घेणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांच्या आढावा बैठकीत ठाकरे यांनी सुमारे साडेनऊशे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संपूर्ण दोन दिवसांच्या बैठकीत निवडणुका, युती, आघाडी या संदर्भात कार्यकर्त्यांशी बिलकूल चर्चा केली नाही.मात्र जे पदाधिकारी पक्ष संघटन वाढवू शकत नाही त्यांना घरी बसविण्याचे सूतोवाच त्यांनी केल्याने आता पक्ष संघटना वाढविण्यास अकार्यक्षम असणारे निष्क्रिय पदाधिकारी घरी बसणार आहे.या बैठकीचा संपूर्ण भर हा पक्षाचे संघटन आणि तळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद इतकाच होता असेच एकूण चित्र होते.