You are here
Home > चंद्रपूर > वृक्षारोपणावर कोट्यवधीचा खर्च

वृक्षारोपणावर कोट्यवधीचा खर्च

सावली : महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संतुलनासाठी वनीकरणावर भर दिला आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येक गावात वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, लावण्यात आलेली झाडे जिवंत आहे की नाही, याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे वृक्षलागवड केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे..

शासनातर्फे गावपातळीवर अनेक योजना राबविल्या जातात. काही योजना गावापर्यंत पेाहोचतात. तर काही योजना कागदोपत्रीच राहतात. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचा परिणाम पाण्याच्या पातळीत कमालीची घट होण्यावर होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेतला. शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, शासकीय कार्यालयांना दरवर्षी वृक्षारोपणाचे उद्दीष्ट दिले जाते. त्यानुसार वृक्षलागवड करण्यात येते. मात्र, ही केवळ औपचारिकता ठरत असल्याचे दिसून येते. शासनाने वृक्षलागवडीसाठी गावपातळीवर नर्सरी उपलब्ध करून दिली असून, त्यात अनेक प्रकारची रोपटी लावले जातात. या नर्सरीमधील रोपट्याचे रोपण केल्यानंतर ती जिवंत आहे की नाही, याकडे कुणीही लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण केले जात असल्याचा प्रकार अनेक गावात दिसून येत आहे.झाडे लावा-झाडे जगवा हा संदेश गावागावांत पोहचविण्यासाठी जनजागृती केली जाते. शाळकरी विद्यार्थी, युवावर्गाच्या पुढाकाराने तसेच सामाजिक कार्यकर्ते व शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तेही वृक्षारोपण केले जाते. मात्र, या वृक्षांचे पुढे काय झाले, त्याचे संवर्धन होते की नाही, याकडे मात्र दुर्लक्ष होते. .

सावली तालुक्यातील जिबगाव, पेठगाव, सिर्सी, साखरी, लोंढोली, हरांबा, कढोली, डोनाळा, उसेगाव, सिंदोळा आदी गावात वृक्षलागवड ही कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सावली तालुक्यातील प्रत्येक गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षारोपण करण्यात आली. मात्र, वृक्षारोपणानंतर त्याचे संगोपन होत नाही. परिणामी लावलेली झाडे काही दिवसातच सुकून जातात. झाडाच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड लावले जात नाही. त्यामुळे मोकाट जनावरे रोपांवर ताव मारतात. तर काही पाण्याअभावी मरत असतात. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला लावण्यात आलेली एकही झाड जगू शकली नाही. यात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. मात्र, लागवड केलेल्या झाडांचा तपशिल अधिकाऱ्यांनी कागदोपत्री दाखवित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे..

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा